नगरपरिषद प्रशासन संचालनालय : स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या अपशब्दांवर मनपा व नपा क्षेत्रातील शाळांमध्ये बंदी याविषयी सविस्तर माहिती
स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या अपशब्दांचा, शिव्यांच्या वापरावर मनपा व नपा शाळांमध्ये बंदी आणण्याविषयी नगर प्रशासन संचालनालय यांच्यामार्फत नुकतेच परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे.
आपल्या राज्यातील स्त्रिया वरील अत्याचाराच्या घटना वाढत असून बदलापूर प्रकरणात मा. उच्च न्यायालय यांनी लैंगिक अत्याचार कमी व्हावे, याकरिता महिलांचा आदर करणे मुलांना शिकवणे व त्यांच्यात लिंग समानतेच्या बाबी रुजवणे आवश्यक असल्याने त्यांची शिकवण कुटुंब व शाळांमधून दिली जावी असे म्हटले आहे. त्या अनुषंगाने नगर विकास विभागाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालयांना आणि सर्व शाळांना आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश या परिपत्रकाद्वारे देण्यात आलेले आहेत.
भारतीय संविधानाने दिलेल्या,मानवी प्रतिष्ठेने जगण्याचा व समानतेचा मूलभूत हक्क स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करण्याचे मूलभूत कर्तव्य लक्षात घेऊन लिंगाधारित समानतेसाठी माता भगिनी व एकूणच स्त्रीत्वाच्या सन्मानासाठी आपल्या समृद्ध संस्कृतीच्या संरक्षणासाठी आणि सद्य सुसंस्कृत व अभिरुची संपन्न समाज निर्मितीसाठी राज्यात शिव्या मुक्त अभियान सुरू करण्यात आलेले आहे.
एकीकडे मातृत्वदिन, रक्षाबंधन, भाऊबीज महिलादिन साजरा केला जातो, त्याचप्रमाणे एक पेड मा के नाम, लाडकी बहीण योजना राबवले जाते, भारत माता की जय घोषणा देण्यात येतात, तर दुसरीकडे आई आणि बहिणीशी निगडित स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या अप शब्दांचा वापर सरासपणे केला जातो ही विरोधाभाषी आणि अत्यंत दुर्दैवाची व सामाजिक नैतिक मूल्यांना पायदळी तुडवणारी बाब असल्यामुळे अशा शिव्यांना हद्दपार करण्यासाठी नगर विकास विभागाचे प्रधान सचिव या नात्याने महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स व शिव्या मुक्त समाज अभियान महाराष्ट्र तर्फे हे अभियान पुढे नेण्यात येणार आहे.
आई बहिणीच्या नावाने शिव्या काही फारशी गंभीर बाब नाही असे धोरण स्वीकारून अशा अनैतिक बाबींना स्वीकार्य रूढी बनू दिल्यास भविष्यात भारतीय समाजाच्या सांस्कृतिक मूल्याची किंमत आपल्याला मोजावे लागेल व समाज अधोगतीकडे जाईल यासाठी ही पावले उचलण्यात येत आहेत.
भारतीय संविधानाच्या तरतुदीच्या आणि राज्यातील माता भगिनींच्या सन्मानाकरिता व लिंगाधारित समानतेसाठी आपण बहिणींचा स्त्रीत्वाचा अपमान होतो अशा अपशब्दांचा वापरास नगरविकास विभागाच्या सर्व कार्यालयांमध्ये राज्यातील मनपा व नपा च्या सर्व शाळांमध्ये बंदी घालण्याविषयी परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
याचाच भाग म्हणून नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी बी.टी पाटील यांनी सुद्धा नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागासाठी स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या शब्दावर बंदी घालण्याविषयी परिपत्रक नुकतेच काढण्यात आलेले आहे.