शिक्षकांना इतकी कामे आहेत ! यादी पाहिली का ?

शिक्षकांना असणारी कामे आणि त्या कामांची वर्गीकरण खालील प्रमाणे

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम २७ नुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामांसाठी नियुक्त करण्यास मनाई करण्यात आली आहे. राज्यातील सर्व मुलांना गुणात्मक व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार वर्षातून प्राथमिक वर्गासाठी किमान २०० दिवस आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी किमान २२० दिवस अध्यापन होणे बंधनकारक आहे.

असे असूनही शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिली जातात व या अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासावर बाधक परिणाम होत असून, अशैक्षणिक कामे न देण्याबाबत विविध संघटना यांची प्राप्त होणारी निवेदने तसेच, विधिमंडळ सदस्य यांचेकडून याबाबत अधिवेशनात विविध आयुधांमार्फत होत असलेली मागणी विचारात घेता, याअनुषंगाने सविस्तर अभ्यासपूर्वक चर्चा करुन यासंदर्भात निर्णय घेण्याच्या दृष्टीने शासन प्रधान सचिव (शालेय शिक्षण) यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती.

हे ही वाचा: जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी परीक्षा 2025 चे ऑनलाईन आवेदन पत्र

सदर समितीची दि.२४.११.२०२३ रोजी बैठक पार पडली असून, समितीने शैक्षणिक व अशैक्षणिक कामांचे वर्गीकरण करुन शासनास अहवाल सादर केलेला आहे. यास्तव शैक्षणिक व अशैक्षणिक काम कोणते, याबाबतची स्पष्टता राज्यातील सर्व शिक्षक तसेच इतर संबंधित यंत्रणा यांना व्हावी, याकरीता शैक्षणिक व अशैक्षणिक कामांचे वर्गीकरण करुन ते सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.याबाबत शासन निर्णय असा निर्गमित झाला आहे.

शिक्षकांच्या शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत :-

१. अशैक्षणिक कामे म्हणजे ज्याचा शिक्षण विभागाशी संबंध नाही किंवा अन्य विभागाकडे परंपरागतरित्या जी कामे शिक्षकांना सांगितली जातात, अथवा जी डाटा एन्ट्री जिचा थेट शिक्षकांशी संबंध नाही, अथवा यासाठी अन्य साधने वापरून जी पूर्ण केली जाऊ शकतात, अशा प्रकारच्या कामांना अशैक्षणिक कामे समजण्यात यावीत.

२. ज्या बाबीचा शिक्षण या बाबीशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध आहे, अशा सर्व बाबी शैक्षणिक बाबी समजण्यात याव्यात.

३. याअनुषंगाने सोबतच्या परिशिष्ट “अ” येथे शैक्षणिक कामे नमूद करण्यात येत असून, शिक्षक वर्गांनी सदर शैक्षणिक कामे करणे आवश्यक राहील.

हे ही वाचा: राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी/ विद्यार्थीनींच्या सुरक्षाविषयक मार्गदर्शक सूचना

४. शैक्षणिक कामांव्यतिरिक्त परिशिष्ट “ब” येथे अशैक्षणिक कामे नमूद करण्यात येत आहेत.

५. सदर अशैक्षणिक कामे शासनाच्या कोणत्याही विभागाकडून शिक्षकांना बंधनकारक करण्यात येऊ नयेत.

६. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम २७ खाली परिशिष्ट- क येथे नमूद केलेली दशवार्षिक जनगणना, आपत्ती निवारणाची कामे व स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य विधीमंडळ व संसद यासाठी होणाऱ्या निवडणूकांची कामे ही शैक्षणिक कामाव्यतिरिक्त येणारी कामे शिक्षकांनी करणे अनिवार्य राहील.

  • शिक्षकांना देण्यात येत असलेली शैक्षणिक कामे प्रामुख्याने खालील विभागात गणली जातात:-

अ) प्रत्यक्ष शिक्षणाची कामे.

आ) शिक्षणाशी संबंधित माहिती संकलनाचे काम.

इ) विद्यार्थी लाभाच्या व शैक्षणिक विकासाच्या योजना.

ई) शिक्षण अनुषंगिक कामे.

प्रत्यक्ष शिक्षणाची कामे:-

१. शासनाने निश्चित केलेल्या अभ्यासक्रमानुसार अध्यापनाचे कार्य करणे.

२. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पूर्व प्राथमिक वर्गासंदर्भातील अध्यापन व इतर अनुषंगिक कामे.

३. शिक्षकांना अध्ययनाच्या विषयात पारंगत होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे. उदा. महाराष्ट्र शासन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांनी विकसीत केलेले, शिफारस केलेले विविध प्रकारचे मोबईल अॅप इ. चा अध्ययन अध्यापनात उपयोग करणे.

४. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करून प्रत्येक मूल शिकले पाहिजे याकडे लक्ष देणे. त्यासाठी त्याचे अभिलेखे जतन करण्याबरोबरच प्रत्यक्षात त्या मुलांच्या अध्ययन निष्पत्तीमध्ये लक्ष देणे.

हे ही वाचा: शालेय पोषण आहारात नवीन पाककृतींचा समावेश

५. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे इ. १२ वी पर्यंतचे शिक्षण अपेक्षित अध्ययन निष्पतीसह पूर्ण करेल. यासाठी child tracking. त्यांच्या प्रगतीचा संकलित अहवाल जतन करण्यासाठी Holistic Report Card नियमित सर्व नोंदीसह अद्ययावत ठेवणे.

६. शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी. ८ वी, NMMS, NTS, MTS, प्रज्ञाशोध परीक्षा इ. परीक्षांसाठी तयारी करून घेणे.

७. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा व क्रीडा विकास करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करणे. उदा. क्रीडा, चित्रकला, हस्ताक्षर, वक्तृत्व स्पर्धा इत्यादी.

८. अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तके विकसन, संशोधन व मूल्यमापन विकसनात, प्रशिक्षण रचना त्याअनुषंगाने होणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेणे.

९. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी मूल्यसंस्कार, राष्ट्रीय नेते यांची जयंती, पुण्यतीथी इतर विशेष दिन साजरे करणे, अभ्यास सहल आयोजीत करणे.

१०. शाळास्तरावरील विविध समित्यांवर अध्यक्ष/सचिव म्हणून कामकाज करणे.

११. न्याय, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टीकोन, लोकशाही जीवन पद्धती या बाबी समोर ठेवून शिक्षकांनी स्वतःच्या क्षमता संवर्धन विकसनासाठी शासकीय संस्थांनी आयोजित केलेले प्रशिक्षण शिबिरास उपस्थित रहाणे.

शिक्षणाशी संबंधित माहिती संकलनाची कामे:-

१. UDISE + व सरल प्रणालीत आवश्यक माहिती भरणे व त्याचे अद्यावतीकरण करणे

२. शाळेत न जाणाऱ्या मुलांचा शोध घेणे व नजीकच्या शाळेत त्यांची नाव नोंदणी करण्याची निश्चिती करणे.

३. नवसाक्षरांचे सर्वेक्षण करणे.

४. योजनांसाठी अत्यावश्यक माहिती शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांकडे उपलब्ध नाही ती ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने मागविणे. ही माहिती स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या यंत्रणेमार्फत संकलित करणे.

विद्यार्थी लाभाच्या व शैक्षणिक विकासाच्या योजनांबाबतची कामे:-

१. शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांसाठीच्या विविध प्रकारच्या योजनांची शाळास्तरावर अंमलबजावणी करणे.

२. शाळांसाठी केंद्र पुरस्कृत योजना / राज्य शासनाच्या योजनांसाठी शाळांची प्रत्यक्ष गरज विचारात घेऊन शाळा विकास आराखडयाच्या माध्यमातून नियोजनासाठी आवश्यक माहिती उपलब्ध करुन देणे. या योजनांतर्गत मंजूर कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे.

३. गैरहजर मुलांच्या पालकांसोबत भेटी घेऊन त्यांचे उदबोधन करणे.

४. शाळा पूर्व तयारी करणे, शाळेत दाखल पात्र मुलांचा शोध घेणे, शैक्षणिक जाणीव जागृती करणे त्याअनुषंगाने मेळावा, शिबिर घेणे, पहिले पाऊल इत्यादी उपक्रमाची अंमलबजावणी करणे

५. शाळा सुधार योजना अंतर्गत लोक सहभागाची माहिती भरणे.

६. उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत येणारी कामे.

अशैक्षणिक कामे:-

१. गावात स्वच्छता अभियान राबविणे.

२. प्रत्यक्ष निवडणूकीच्या वेळी आवश्यक कामाव्यतिरिक्त निवडणूक विषयक नियमित चालणारी कामे करणे.

३. हागणदारीमुक्त अभियान राबविणे,

४.. इतर विभागाच्या विविध योजनांसाठी विद्यार्थी लाभार्थी म्हणून पहिल्यांदा नोंद केल्यानंतर पुढील वर्गासाठी परत परत नोंदणी करणे.

५. गावातील तंटामुक्ती व इतर समित्यांवर सदस्य म्हणून काम करणे.

६. इतर संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आयोजित करणे.

७. शासन किंवा शासनाच्या संस्था जसे शिक्षण आयुक्तालय, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, यांच्या मान्यतेने स्वयंसेवी संस्था किंवा अन्य बाहयसंस्था यांचेसोबत झालेले सामंजस्य करार वगळून इतर स्वयंसेवी संस्था किंवा अन्य बाहयसंस्था यांचेकडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात सहभागी होणे. करून घेणे.

८. विविध प्रकारची सर्वेक्षणे त्यामध्ये दारिद्रय रेषेखालील कुटुंबाचे सर्वेक्षण, पशु सर्वेक्षण, शौचालय सर्वेक्षण इत्यादी सर्वेक्षणाचे काम करणे.

९. शालेय कामकाजाव्यतिरिक्त अन्य विभागांची माहिती संकलित करून त्या विभागाच्या अॅप/संकेतस्थळावर नोंद करणे.

१०. जी माहिती संगणकीय प्रणालीमध्ये उपलब्ध आहे, ती माहिती ऑफलाईन पद्धतीने दुबार मागविणे.

११. अनावश्यक प्रशिक्षणे, कार्यशाळा, उपक्रम, अभियाने, मेळावे इत्यादी शासनाच्या मान्यतेशिवाय राबविले जाणे. शासन मान्यता नसलेल्या अशा प्रकारच्या कार्यक्रमात शिक्षकांनी कर्तव्य कालावधीत ऑनड्यूटी सहभाग घेणे.

१२. शिक्षण विभागाकडील कामाव्यतिरिक्त अन्य विभागाकडून देण्यात येणारी कामे.

बालकांचा मोफत व सक्तीचा अधिनियम 2009 मधील कलम 27 अंतर्गत  नमूद अनिवार्य कार्ये

१. दशवार्षिक जनगणना.

२. आपत्ती निवारणाची कामे.

३. स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य विधीमंडळ व संसद यासाठी होणाऱ्या निवडणूकांची कामे.

Leave a Comment