दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत धृवनगरच्या मनपा शाळेत योगासनासह विविध खेळ आणि उपक्रम ! सविस्तर माहिती
शनिवार 28 सप्टेंबर रोजी नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागातील शाळा मनपा शाळा क्रमांक 22 धृवनगर या शाळेमध्ये दप्तर मुक्त शनिवार अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दप्तरमुक्त शनिवार हा उपक्रम राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये आज मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो.. तत्पूर्वी सर्वात अगोदर नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी बी.टी पाटील यांनी या उपक्रमाची सुरुवात नाशिक महानगरपालिकांच्या शाळांमध्ये केली होती. हाच उपक्रम राज्यातील शाळांना लागू करण्यात आलेला आहे.
हे ही वाचा : शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात मनपा शिक्षण विभागाची शिक्षण परिषद संपन्न
आठवड्यातून एक दिवस मुलांसाठी बदल म्हणून व विद्यार्थ्यांचा शारीरिक,मानसिक आणि बौद्धिक विकास घडून यावा यासाठी दप्तर मुक्त शनिवार हा उपक्रम अतिशय लाभदायी ठरतो. या उपक्रमामुळे मुलांची अभ्यासाच्या ताणातून एक दिवस सुटका होते, त्यामुळे शनिवार हा विद्यार्थ्यांसाठी अतिशय आवडीचा दिवस असतो.
धृवनगरची मनपा शाळा ही इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत आहे. इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या वर्गातील वर्गशिक्षक आपल्या आपल्या कल्पनेनुसार किंवा शाळेच्या सामूहिक विचारानुसार शाळेमध्ये विविध उपक्रम आणि खेळ यांचे आयोजन करत असतात. यामध्ये भाषिक खेळ असतात. शारीरिक बौद्धिक खेळांचा सुद्धा समावेश यामध्ये होत असतो.
हे ही वाचा : मुख्याध्यापक सोनजी गवळी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
महानगरपालिका शाळा क्रमांक 22 धृवनगर च्या सकाळ सत्रात इयत्ता पाचवीच्या वर्गाचे वर्गशिक्षक नामदेव जानकर यांनी योगासनासह, खो-खो,लंगडी इत्यादी खेळ यांचे आयोजन केले होते. इयत्ता चौथी चे वर्गशिक्षक संतोष महाले आणि उपशिक्षिका दिपाली काळे यांनी दोरीवरील उड्या, लंगडी, खो-खो आणि योगासने यांचे आयोजन केलेले होते.
इयत्ता पहिलीच्या वर्गशिक्षिका लता सोनवणे यांनी विद्यार्थ्याकडून कोलाज काम करून घेतले. यामध्ये घराचे कोलाज काम याचा समावेश होता. इयत्ता तिसरीचे वर्गशिक्षक ईश्वर चौरे यांनी दप्तर मुक्त शनिवार अंतर्गत तिसरीच्या वर्गाकडून विविध खेळाचे आयोजन केले होते त्यामध्ये पाढे बोला व संगीत चप्पल खेळ आणि हसत खेळत नाचत पाढे पाठांतर करणे, कवायत प्रकार याचा समावेश होता.
इयत्ता दुसरीच्या वर्गशिक्षिका कल्पना पवार यांनी विविध शैक्षणिक खेळांचे आयोजन केले होते.
दप्तर मुक्त शनिवार अंतर्गत हा उपक्रम शाळेचे मुख्याध्यापक सोनजी गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आला. आजचा दप्तर मुक्त शनिवार हा उपक्रम सर्व वर्ग शिक्षकांनी यशस्वीपणे पार पाडला. त्यासाठी सर्व शिक्षकांचे एकमेकांना सहकार्य लाभले.