Nashik-Goa,karnataka Trip : कणेरी मठ आणि महालक्ष्मी दर्शन बाबत गंमती – जमती आणि बरेच काही !
मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ठराविक गोष्टींना खूप महत्त्व असते.त्यामध्ये लग्न,नोकरी आणि आयुष्यामध्ये केलेला प्रवास यांचा समावेश होतो.त्यात काही गोष्टी आपण ठरवून करत असतो तर काही गोष्टी या अपघाताने घडून येत असतात. खरे पाहता अपघाताने घडून येणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये खूप काही आनंद देऊन जातात. असाच प्रवासाचा आमचा प्लॅन काहीसा ठरला असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही.
आम्हाला कुठेतरी फिरायला जायचंय,आम्हाला कुठेतरी फिरायला जायचंय,आम्हाला कुठेतरी फिरायला जायचंय हे मनात हजार वेळा मी म्हटले होते, पण वेळ तशी कधीच आलेली नव्हती.आमचे मित्र आनंद काळे आणि त्यांचा परिवार चंद्रपूर जिल्ह्यात मूल या ठिकाणी नोकरीनिमित्त राहतो .आमच्यामध्ये कुठेतरी फिरायला जाण्या संदर्भात बऱ्याच वेळा चर्चा झालेली होती..
हे ही वाचा: शिक्षकांना इतकी कामे आहेत ! यादी पाहिली का ?
तशी चर्चा या अगोदरही झालेली होती.. पण ती फळाला येईल अशी वाटली नव्हती. प्रत्येक वर्षी चर्चा करत होतो आणि मे सुट्टी महिन्यामध्ये आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये आम्ही ती विसरून जात होतो. यावेळी मात्र आमची मनोकामना सफल झाली. आनंदच्या परीक्षेमुळे आम्ही थोडासा प्रवासाला उशीर केलेला होता. त्याची परीक्षा अगोदर एक दिवस संपणार होती. त्यामुळे त्यांनी आम्हाला सहा जून ची तारीख दिलेली होती. शेवटी सहा जूनला आनंद काळे आणि त्यांचे कुटुंब नाशिकच्या सीबीएस येथे उतरलेले होते आणि मी त्यांना माझी गाडी घेऊन आणण्यास गेलेलो होतो.ती एक विश्वास न बसणारी गोष्ट असावी असे आज मला वाटते. जून महिन्याचा सहावा दिवस उजाडला होता त्यासाठी.काळे परिवार आमच्या घरी येणार त्याचा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झालेला होता.
साधारणपणे सकाळी नऊच्या दरम्यान काळे परिवार नाशिकच्या सीबीएस च्या मुख्य चौकात उतरलेला होता. त्या अगोदर रेल्वे स्टेशन वरून उतरल्यानंतर काळे सरांचा मला नाशिकच्या नाशिक रोड बस स्थानकावरून फोन आलेला होता की ही गाडी येणार आहे तिकडे, तर येऊ का यावर त्यांनी मार्गदर्शन सुद्धा घेतले होते. गाडी आमच्या परिसरात जवळच्या बस स्थानकावर थांबणार होती परंतु काळे सरांना हा परिसर अनोळखी असल्याने मी त्यांना सेंट्रल बस स्थानक म्हणजे सीबीएस या ठिकाणीच थांबायला सांगितले. आणि त्यानंतर मी त्यांना घेऊन येण्यासाठी निघालो.
त्यावेळी नाशिकमध्ये पावसाचे वातावरण अजिबात नव्हते परंतु ढग मात्र आकाशामध्ये काळेभोर दिसत होते. घरी आल्यावर काळे परिवारांनी अंघोळ जेवण वगैरे या गोष्टी उरकून घेतल्या. आम्ही ठरवलं होतं की याच दिवशी आपण गोव्यासाठी निघायचं आहे. साधारणपणे दोन अडीचची वेळ असावी. आम्ही गाडीसाठी फोन केला होता.
हे ही वाचा: जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी परीक्षा 2025 चे ऑनलाईन आवेदन पत्र
नाशिक येथील सातपूर मधील धृवनगर परिसरात राहणारे चंद्रकांत साळुंखे जे भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त झालेले आहेत, त्यांची ईरटीगा ही चार चाकी आहे. चंद्रकांत साळुंखे हे सुद्धा आमचे मित्र आहेत. आमच्या या गोवा नियोजनाविषयी त्यांना अगोदरच मी कल्पना दिलेली होती आणि गाडी सुद्धा त्यांची ठरवलेली होती. खरे पाहता चंद्रकांत साळुंखे यांनी गाडीसाठी दुसरा चालक सुचवलेला होता परंतु आम्ही त्यांना सांगितलेलं होतं की आमच्या प्रवासासाठी तुम्हीच गाडी घेऊन यायचे आहे.
त्यावर त्यांनी होकारार्थी प्रतिसाद दिलेला होता.फोन केल्यानंतर जवळजवळ दहा ते पंधरा मिनिटांमध्ये गाडी आमच्या दारासमोर उभी होती. काळा टी-शर्ट घातलेले आणि सैन्यातील ती डिझाईन असणारी पॅन्ट त्यांनी परिधान केलेली होती.उंच आणि धिप्पाड चंद्रकांत साळुंखे एखाद्या सैन्यातील ऑफिसर सारखे वाटत होते. चंद्रकांत साळुंखे यांना आम्ही अगोदर सूचना दिलेली होती की, गाडीवर साहित्य बांधण्यासाठी कॅरियर ची व्यवस्था असणे गरजेचे आहे, त्याप्रमाणे त्यांनी गॅरेज ची व्यवस्था केलेली होती.
चहापाणी झाल्यानंतर आम्ही सर्व साहित्य घेऊन जिथे गाडी आमच्या दारासमोर उभी आहे, त्या ठिकाणी आमचे सगळे दोन परिवार सामानासह उभे होते.भल्या मोठ्या बॅगा आणि सुटकेस चाकासह घेऊन आम्ही गाडी जवळ आलेलो होतो. चंद्रकांत साळुंखे यांनी सर्व बॅगा गाडीवर ठेवल्या आणि लांब वायरच्या दोरीने त्या सर्व बॅगा त्यांनी घट्ट आवळून बांधल्या.आमचे दोन्ही परिवार गाडीमध्ये बसले.मी पुढील सीटवर ड्रायव्हरच्या शेजारी बसलेलो होतो. मधल्या सीटवर काळे परिवार अर्थात आनंद काळे आणि त्यांच्या श्रीमती बसलेल्या होत्या. त्यांच्या बाजूला आमच्या श्रीमती नम्रता बसलेली होती आणि सगळ्यात शेवटच्या सीटवर आमचे चिरंजीव अमर आणि कन्या आकांक्षा व काळे सरांच्या मेहुणीची कन्या बसलेली होती.
हे ही वाचा: राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी/ विद्यार्थीनींच्या सुरक्षाविषयक मार्गदर्शक सूचना
साधारणपणे तीन वाजण्च्यायाच्या दरम्यान आमचा प्रवास सुरू झाला.गाडी सीएनजी आणि पेट्रोल असल्याने बऱ्याच वेळा सीएनजी भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गाडी थांबवावी लागे. त्यामुळे विश्रांतीसाठी गाडी थांबवण्याची जास्तीत जास्त वेळ कधी आलीच नाही. सीएनजी साठी गाडी थांबल्यानंतर आम्ही थोडेसे खाली उतरून पाय मोकळे करत होतो.
टाकी अर्धी जरी रिकामी झाली आणि सीएनजी पेट्रोल पंप दिसला की चंद्रकांत साळुंखे हे टाकी पूर्ण भरत असत. त्यामुळे गाडीमध्ये बसलेल्या महिला वर्गाला हे समजत नव्हते की गाडी पेट्रोल पंपावर सारखी का थांबवत आहेत. त्यांना मधल्या काळामध्ये थोडे समजून सांगितल्यानंतर त्यांच्या प्रश्नाचे उत्तर त्यांना मिळालं होतं. पण त्या अगोदर गाडी जास्त थांबवत असल्यासारखे त्यांना वाटून त्या थोड्या नाराजगी दाखवत असत.
प्रवासामध्ये विविध ठिकाणचे पाणी प्यावे लागेल याची जाणीव असल्याने नाशिक मध्येच आम्ही पाण्याच्या बाटल्यांचा बॉक्स गाडीमध्ये सोबत घेतलेला होता. त्यामुळे प्रवासामध्ये आम्ही कोणत्याही ठिकाणी स्थानिक पाणी पिले नाही.गाडीमध्ये इकडल्या तिकडल्या गप्पा झडत होत्या. काळे सर आणि माझ्यामध्ये मिमिक्रीची जुगलबंदी चालली होती. आनंदा काळे यांच्या पत्नी या सुद्धा खूपच विनोदी स्वभावाच्या आहेत हे आम्हाला कळून चुकलेलं होतं. आनंद काळे यांच्या पत्नी सुद्धा प्राथमिक शिक्षिका आहेत. त्यांना मराठी कन्नड,तेलगू, हिंदी अशा विविध भाषा येतात याचे आश्चर्य मला आणि आमच्या परिवाराला नक्कीच वाटतं.त्यांनी चंद्रपूर गडचिरोली येथील भौगोलिक परिस्थिती आणि तिथे नोकरी करत असलेल्या लोकांच्या समस्या विषयी खूप काही किस्से सांगितले.
हे ही वाचा: शालेय पोषण आहारात नवीन पाककृतींचा समावेश
आनंद काळे आणि त्यांच्या पत्नी यांचे गाडीमध्ये थोडेसे गोड गोड वाद सुद्धा होत होते. परंतु ते आमच्यासाठी एक करमणुकीचे साधन होते असे त्यावेळी वाटत होते. पत्नीला घाबरून राहिले तर माणूस सुखी राहतो असे तत्त्वज्ञान असलेला आमचा मित्र आनंद काळे प्रत्यक्षातही असेच सोज्वळ वागत असलेले आमच्या नजरेतून चुकले नाही. मधून मधून बायको साठी काय पण हा शब्द त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्यासाठी चांदीचा मुलामा असावा असे वाटत होते.
एकाच ठिकाणी सीटवर जास्त वेळ बसल्याने थोडीशी गुंगी सुद्धा येत होती. गप्पाच्या ओघांमध्ये कोणीतरी विनोद केला की ती गुंगी अचानक गायब सुद्धा होत होती. गुंगी आणि हास्याचे फवारे यांची जुगलबंदी गाडीमध्ये सुरू होती. आनंदराव काळे आणि मी नामदेव जानकर यांच्यामध्ये पंजाबी व भोजपुरी भाषेची टर उडवणारे संवाद चालू होते. डीएड कॉलेजच्या आठवणी परत परत जागवल्या जात होत्या.
सहा जूनला रात्री दहा च्या वेळेस आम्ही कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी जवळ पोहोचलेलो होतो. परंतु सगळे गाडीमधले थकलेले असल्याने आता विश्रांतीची नितांत आवश्यकता होती. त्यामुळे आता आम्ही राहण्याची व्यवस्था कुठेतरी मिळते का याविषयी चर्चा करू लागलेलो होतो.. गाडीचे चालक आणि मालक असलेले चंद्रकांत साळुंखे यांनी गाडी थांबवत निवासाची चौकशी सुद्धा सुरू केलेली होती.
तेवढ्या दोन तरुण गाडीवर बाजूने आले आणि त्यांनी निवासाविषयी सुविधा असल्याचे चंद्रकांत साळुंखे यांना सांगितले. भावामध्ये काहीशी बार्गेनिंग करून आम्ही त्या निवासस्थानी पोहोचलो. हे निवासस्थान जवळजवळ तीन मजली होते. जुन्या कोल्हापूरमध्ये हे ठिकाण होते. गाडीवरचे सर्व साहित्य चंद्रकांत साळुंखे यांनी काढले व सगळ्यांच्या ताब्यात देऊन टाकले आणि ते घेऊन आम्ही त्या निवासाची व्यवस्था करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे जाऊ लागलो.. त्यांनी दुसऱ्या व तिसऱ्या माळ्यावर आम्हाला दोन खोल्या उघडून दिल्या.. खोल्या मोठ्या आणि चांगल्या स्थितीमध्ये होत्या. संडास-बाथरूम,बेड या सगळ्यांची सुविधा या ठिकाणी होती. आम्ही एक पुरुषांसाठी खोली आणि एक स्त्रियांसाठी खोली निश्चित केली आणि त्या पद्धतीने खोलीमध्ये आम्ही त्या रात्री निवास केला.जेवण आम्ही प्रवासातच केले असल्याने रात्री कोल्हापुरात जेवण केले नाही. त्यानंतर सर्वजण झोपी गेलो.
सकाळी उठून आम्ही महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला निघालो. दर्शनाला निघत असताना महिलांच्या अभूषणाची दुकाने अशी चमचम करत होती की तेथे फोटो काढावे अशी इच्छा झाली. आम्ही तेथे फोटो सुद्धा काढले. महालक्ष्मीचे दर्शन घेऊन आम्ही गाडीत बसलो आणि कनेरी मठाच्या दिशेने निघालो. सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान आम्ही कनेरी मठाजवळ आलो. गाडीतील चंद्रकांत साळुंखे यांच्याशिवाय गाडीतील सर्वांनी तिकिटे काढली. आम्ही त्यांचे सुद्धा तिकीट काढण्याचा विचार करत होतो परंतु त्यांनीच तिकीट न काढण्याचा सल्ला दिला.
आम्ही कनेरी मठामध्ये शिरलो. भल्या मोठ्या परिसरामध्ये कणेरी मठ पसरलेला होता. त्याची वेस पाहून सगळेच भारावले होते. जसे जसे आत जावे तसतसे उंच पायऱ्या दिसत होत्या. अनेक शिल्पे त्या पायऱ्यांच्या बाजूला रस्त्या च्या बाजूला उभे असलेले दिसून येत होते. गर्द अशी झाडी पाहून सगळेच अवाक झालेले होते.. शिवशंकराची खूप मोठी मूर्ती त्या ठिकाणी डोळ्यात सगळेजण साठवत होते. वर गेल्यावर एक वेस दिसते, त्या समोर हत्तीचे दोन पुतळे समोरासमोर उभे असलेले दिसून येतात. त्याच्यासमोर मंदिराची वेस आहे या वेशीतून आत गेल्यावर बरेच मंदिरे दिसून येत होती.
या मंदिरामध्ये भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या होत्या. आम्ही सुद्धा धावते दर्शन घेतले आणि वेशीतून बाहेर पडलो. आता आम्हाला म्युझियम कडे जायचे होते. आम्ही तेथे असणाऱ्या व्यक्तींना म्युझियम विषयी विचारले. लोकांनी डाव्या हाताला सांकेतिक भाषेत आम्हाला सांगितले. नंतर तेथे एक व्यक्ती सुरक्षा गार्डच्या वेशात दिसत होता. तो लोकांना या कणेरी मठाविषयी मार्गदर्शन करत होता. आमचे मित्र आनंद काळे यांना सुद्धा मार्गदर्शन मिळवण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी सुद्धा त्या व्यक्तीस कनेरी मठ विषयी माहिती विचारण्यास सुरुवात केली आणि ती त्यांनी मनसोक्त पणे सांगितली . सर्व तिकिटे आम्ही त्या व्यक्तीजवळ देऊन आम्ही गुहेमध्ये शिरलो गुहेमध्ये गेल्यानंतर इतकी छान छान शिल्पे, रंगीबेरंगी मुर्त्या आम्ही पाहत होतो., आत मध्ये रंगीत लाइटिंग सुद्धा होती. आम्ही मंत्रमुग्ध होऊन आत मध्ये ते सर्व पहात फिरत होतो.
आमच्याबरोबर इतरही पर्यटक त्या ठिकाणी होते. तरुण मुले होते,तरुण मुली होत्या, मध्यम लोक होते. काहीसे वेगळ्या जगात आल्याचा भास आम्हा सगळ्यांना होत होता. इतकं पाहणं शक्य नाही असे आम्हाला वाटू लागले. कारण आम्हाला पुढचा प्रवास ही करायचा होता. गाडीचे चालक-मालक आणि आमचे मित्र आनंद काळे यांच्यात गुपित असं काहीतरी ठरलेलं होतं हे मला नंतर कळालं. ते असे होते की इथून थेट मुरुडेश्वर ला जायचे होते. मी समजत होतो गोव्या थेट जाणार आहोत.
मुरुडेश्वर हे कर्नाटकामधील समुद्रामध्ये असलेलं एक भव्य दिव्य असं मंदिर आहे.. त्यामुळे आम्ही लवकरच तिथून काढता पाय घेतला. अजूनही पहावे या ठिकाणी असे वाटत होते परंतु वेळेअभावी आम्ही म्युझियम मधील पर्यटन थांबवले आणि गाडीकडे निघालो.जिथून आम्ही गेलेलो होतो, त्या वेशीजवळ आम्ही गाडी शोधू लागलो. समोरच गाडी दिसली आणि आम्ही गाडीमध्ये जाऊन बसलो. मुरुडेश्वर,कर्नाटक साठी रवाना झालो. मित्रांनो यापुढील भाग लवकरच आपल्यासाठी आणत आहे……..क्रमश :