नाशिकच्या जल्लोष गृपचा ट्रेकिंग मध्ये जल्लोष : जिदंगी ना मिले दोबारा…!

नाशिकच्या जल्लोष गृपचा ट्रेकिंग मध्ये जल्लोष : जिदंगी ना मिले दोबारा…! सविस्तर लेख सुदाम धोंगडे यांचा !


गेल्या बऱ्याच वर्षापासून मी ट्रेक करत आहे. स्वत: ला ट्रेकर समजण्या इतके विविध प्रकारचे ट्रेक मी काही करत नाही किंवा ट्रेक बद्दल पाहिजे तेवढे ज्ञान व कौशल्यही माझ्याकडे नाही, त्यामुळे मी मुळीच ट्रेकर नाही. मी फक्त शारिरीक आणि मानसिक स्वास्थासाठी भिंगरी सारखा दर रविवारी जल्लोष ग्रुप सोबत भिरभिरत असतो. दर रविवारी ट्रेक संपल्यानंतर त्याचे फोटो सोशल मिडियावर मिरवणे हा माझा नित्यक्रमच ठरलेला आहे.

तसं म्हटलं तर तुमचे फोटो लोकांनी पाहणे आणि त्यांना लाईक कमेंटस करणे यासाठी त्यांना वेळ नाही आणि तुमच्या फोटोमध्ये रसही नाही. लोक बघतील- पाहतील स्तुती करतील यासाठी मी काही सोशल मिडियावर मिरवत नाही आणि ट्रेक करत नाही. मिरवणे हे माझ्या स्वभावतही नाही. सोशल मिडिया हे असे माध्यम आहे जिथे तुमचे अनेक वर्षांचे फोटो तुम्ही पाहू शकतात, तिथे ते सुरक्षित राहतात आणि दरवर्षी वाढदिवसासारखे तुमच्या कर्तृत्वाची आठवण न चुकता करून देतात. लोक तुमचे कर्तृत्व विसरतात पण सोशल मिडिया विसरत नाही म्हणनू त्यावर फोटो टाकून मिरवायचे असते असो.

ट्रेकचे फोटो सोशल मिडियावर टाकून मिरवत असल्याने बऱ्याच हितचिंतक मित्रांनी, जल्लोष ग्रुपमधील सदस्यांनी तसेच चक्क नानांनी (श्री. संजय अमृतकर) तुझे लिखाण छान आहे तु लिहित जा असा सल्ला दिला. परंतु माझ्यापेक्षा अनेक जातिवंत ट्रेकरचे व हौशी ट्रेकरचे लेख सोशल मिडियावर उपलब्ध असल्याने मी नेहमीच टाळाटाळ करत आलो. त्यात लोकांना वाचायला वेळ नाही, प्रोत्साहन दयायला वेळ नाही, त्यामुळे लिखाण न करण्यातच धन्यता मानत होतो.

परंतु कालचा ट्रेक मला भुरळ घालून गेला आणि त्यात दादांनी (संदिप काकड) यांनी त्यांच्या वाढदिवसापासुन लिखाण करतो असा शब्द त्यांना दिला होता त्याची आठवण त्यांनी करून दिली असा दुहेरी संगम झाल्याने लिखाण सुरू करण्याचा मानस मी केला. त्यानिमित्त्ताने साधभोळ लिखाण अत्यंत कमी शब्दात तुमच्या समोर यापुढे मांडणार आहे. पदरात घ्यावे.

किल्ले त्रिंगलवाडी- पुष्पोत्सव


पावसाळयात नाशिककरांना ट्रेकची पर्वणी असते. या पर्वणीमध्ये अनेक गड किल्ल्यांचा व डोंगर रागांचा समावेश होतो त्यापैकीच एक म्हणजे किल्ले त्रिंगलवाडी. सभासदांची जमावाजमव झाल्यानंतर रविवार, २२ सप्टेंबर २०२४ रोजी आमची गाडी सकाळी ठिक सहा वाजता त्रिंगलवाडी किल्ल्याच्या दिशेने निघाली. घोटी टोलनाका सोडल्यानंतर लगेच पुढे उजव्या बाजुला टाकेघोटी नावाचे गावं लागते. टाकेघोटी पासनू १० किमी अंतरावर तळयाची वाडी लागते. तळयाची वाडीमध्ये पोहचून तिथून ट्रेकला सूरूवात केली.

गावातूनच किल्ले त्रिंगलवाडी दर्शन झाले. वाडी सोडल्यानंतर जिकडे तिकडे हिरवाईने नटलेला परिसर दिसत होता. वाडीच्या सुरुवातीलाच सुंदर अशा तळ्याचे दर्शन झाले. तळयाच्या भोवतालीच्या परिसराने तळयाला देखणे रूप प्राप्त झाले होते. हिरवाईने नटलेले भाताचे पीक आणि जिकडेतिकडे पसरलेली हिरवीगार झाडे यामुळे निसर्गाची शोभा नजरेत भरत होती.

थोडे अंतर चालल्यावर जैन मंदिर लागले, जिथे सुंदर पण तुटलेल्या मूर्ती होत्या. मंदिराचे सुंदर कोरलेले प्रवेशद्वार आणि गर्भगृहातील पहिले जैन तीर्थंकर ऋषभनाथाची दगडी मूर्ती दिसली. गुहेत मोठा सभामंडप. गडाचे पश्चिमेकडील प्रवेशद्वार हे स्थापत्य कलेचे एक अद्वितीय वास्तूचे देखणे रूप बघावयास मिळते. पायऱ्या आणि प्रवेशद्वार एकाच खडकात कोरलेले दिसल्या. पावसाळा असल्याने मंदिरात काही प्रमाणात शॉवर सूरू होते. शॉवर घेवून झाल्यानंतर पुढे निघालो. हळूहळू चालत असतांनाच फुलांचे दर्शन होण्यास सूरूवात झाली. थोडे माथ्यावर आल्यानंतर आजुबाजुचा परिसर आम्हांना भुरळ घालत होता.

दुर्मिळ असे दिसणारे सोनकी फुले पुढे आल्यानंतर विपूल प्रमाणात दिसू लागली. सोनकी फुले हे सहयाद्रीच्या जंगलातील पावसाळयातील एक विशेष आकर्षण. सोनकी फुलांच्या पिवळसरपणा मुळे जणू परिसर सोनेरी दागिन्यांने सजविलेला आहे असा भास होत होता. अशा देखाव्यामुळे फोटो काढण्याची आमच्यात जणू स्पर्धाच लागली होती. गडावर जाण्यासाठी पाय पुढे होत नव्हते. शेवटी ध्येय गाठण्यासाठी पुढे निघालो. थोडे अंतर पुढे जातोच तर आश्चर्य रानोमाळ बहरलेली फिकट गुलाबी रंगाची तेरडयाच्या फुलांनी आमचे लक्ष वेधले. गडाच्या पोटाशी पायवाटेने चालतांना दोन्ही बाजुने तेरडयाची फुले आमचे स्वागतच करत असल्याचे भास होत होता. त्यामधून चालतांना ” हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने” या गाण्याची आठवण होवून गाणे गुणगुणत पुढे निघालो.

किल्ल्यावर जाण्यासाठी ६० ते ७० डिग्रीमध्ये सुमारे ४० ते ५० पाय-या लागल्या. सुरूवातीलाच तुटलेल्या पाय-या पार करून वर चढलो. प्रवेशव्दारा जवळच अंजनी सुत- बजरंग बलींचे दर्शन झाले. अतिशय छान अशी बजरंग बलींची मूर्ती पाहून हनुमान चाळीस म्हणण्याचा मोह तुषार आणि पाटील सरांना आवरला नाही. तुषार आणि पाटील सरांनी हनुमान चाळीस म्हटंली. मी आणि दादा हात जोडून बजरंग बलीचे रूप न्याहाळत उभे राहिलो. शेजारच्या दरवाज्यातून आत प्रवेश केला.

वरती प्रवेश करताच पुन्हा एकदा मनमोहक असे दृश्य दिसले. गडावरून आवतीभोवतीचा परिसर पाण्याने वेढलेला दिसला. गडावरून मुकणे धरण, वैतरणा धरण, दारणा धरण, भावली धरण पाणी साठा दिसला. हिरवा परिसर व धरणांच्या पाण्यामुळे जूण काही आपण स्वर्गातच आल्याचा भास होत होता.
गडाच्या माथ्यावर पोहचल्यावर सोबत आणलेल्या न्याहारीवर फुलांच्या मळयात ताव मारून खाली उतरण्यास सुरूवात केली. आपण गडाला वळसा मारून जावू असे पाटील सरांनी सुचविल्या प्रमाणे पुढे निघालो. मनमोहक दृश्य डोळयासमोर ठेवूनच मार्गक्रम करत होतो. तोच समोर फुलांचा मळाच लागला.

सोनकी व तेरडयाची फुले आज अक्षरश: आमच्यावर वर्षाच करत होते. समोरील दृश्य पाहून कश्मीरला आल्या सारखा भास होत होता. जिकडे तिकडे रंगीबेरंगी फुले पाहून “कितनी खूबसूरत ये तस्वीर है, मौसम बेमिसाल बेनज़ीर है,ये कशमीर है, ये कशमीर है” या गाण्याची आठवण झाली. “इस ज़मीन से आसमान से,फूलों के इस गुलसिताँ से,जाना मुश्किल है यहाँ से” या पंक्तीप्रमाणे पुढे जाण्याची अजिबात इच्छा होत नव्हती. पुढे चालत गेल्यानंतर भवानी मातेचे मंदिर लागले. दर्शन घेतल्यानंतर गड उतरण्यास सुरूवात केली. वाटेत दोन टाके लागली. टाके पाण्याने तुडूंब भरलेले त्यात मासे मनसोक्त विहार करत होती.

दादा सर्वाच्या पुढे चालत होते. आम्ही ज्यामार्गाने चढलो त्याच मार्गाने उतरण्यासाठी दादांना आवाज दिला परंतु दांदाना पायऱ्या दिसल्याने आम्ही त्याच सोप्या मार्गान खाली उतरण्यास सुरूवात केली. ३० मिनिटात खाली उतरलो.
किल्ला चढण्यास अतिशय सोपा असून त्याची उंची अंदाजे 987 मीटर असुन चढाई सोपी आहे. साधारणपणे १.३० तास गडावर पोहचण्यास वेळ लागतो. गडावर पाण्याची सोय व राहण्यासाठी गुहा आहे. [लेणी आणि किल्ला 10 व्या शतकाच्या आसपास बांधला गेला असावा. कोकणाला नाशिकला जोडणाऱ्या व्यापारी मार्गाकडे लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता .

1636 मध्ये शहाजी (राजा छत्रपतीशिवाजीचे वडील) यांना माहुलीफोर्ट येथील पराभवानंतर ते मोगलांच्या स्वाधीन करावे लागले . छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचा ताबा कधी घेतला हे माहीत नाही , पण १६८८ मध्ये हा किल्ला मोगलांनी जिंकला. १८१८ मध्ये त्र्यंबकगड किल्ला पडल्यानंतर ब्रिटीशांच्या स्वाधीन झालेल्या १६ किल्ल्यांपैकी हा एक आहे.]संदर्भ -विकिपिडिया)
कास पठारासारखा सुंदर नजारा, फुलांनी सजलेला परिसर, आणि हिरवाईने नटलेला निसर्ग मनमोहक होता. शांत वातावरणाने मनाला अपार शांती मिळाली. या ट्रेकने एक अविस्मरणीय अनुभव दिला जो कायमचा आमच्या मनात कोरला गेला!
“जिंदगी ना मिले दोबारा” म्हणून या निसर्गाचा आणि गडकिल्ल्यांचा आनंद घेत राहू…
1…..2…..3…… जल्लोष
शब्दांकन
सुदाम जयराम धोंगडे, 9922447069
सदस्य, जल्लोष ट्रेकिंग ग्रुप नाशिक.

Leave a Comment