नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता ३री ते ८वी साठी विषययोजना, शालेय कामाचे दिवस, विषय निहाय तासिका विभागणी व शालेय वेळापत्रक निश्चित करणेबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे:
Table of Contents
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंमलबजावणी अंतर्गत राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) (NCF-SE) २०२३, राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) (SCF-SE) २०२४ व नवीन शालेय शिक्षण अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आलेली आहे. सन २०२५-२६ पासून राज्यात नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. नवीन अभ्यासक्रम लागू होणाऱ्या इयत्तांसाठी विषय निहाय शैक्षणिक तासिका विभागणी विहित करणे आवश्यक आहे. इ.१ली व २री साठी शालेय वेळेचे नियोजन विहित करुन देण्यात आलेले आहे. सद्यस्थितीत लागू असलेले संदर्भ क्र. १ येथील परिपत्रक दि.०५/१०/२०१७ मध्ये सुधारणा करुन इ.३री ते ८वी साठी विषयवार तासिका विभागणी व वेळेचे नियोजन याद्वारे राज्यात लागू करण्यात येत आहे.
नवीन अभ्यासक्रम लागू होणार असल्याने इयत्ता ३री ते ८वी साठी विषययोजना, तासिका विभागणी व वेळापत्रकाबाबत पुढीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.
अ. शालेय वेळेचे नियोजन-

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंमलबजावणी अंतर्गत नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणी करीता शाळांसाठी वरीलप्रमाणे वेळेचे नियोजन लागू करण्यात येत आहे. एकाच सत्रात भरणाऱ्या व दोन सत्रात भरणाऱ्या शाळांसाठी वेळेची विभागणी स्वतंत्रपणे देण्यात आलेली आहे.
आ. विषययोजना –

त्रिभाषा धोरण अंमलबजावणीबाबत समितीच्या शिफारशी व त्यावरील होणाऱ्या शासनाचे निर्णयास अनुसरुन तिसऱ्या भाषेबाबत निर्णय होईपर्यंत प्रचलित अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकांचा उपयोग करण्यात यावा. असा निर्णय राज्यस्तरीय सुकाणू समिती बैठक दि.१०/०२/२०२६ मध्ये घेण्यात आलेला आहे. सबब, प्रचलित पद्धतीनुसार तिसरी भाषा (R-२ अथवा Composite) बाबत विद्यमान धोरण कायम असल्याने इ.५वी पासून पुढील वर्गासाठी यापूर्वी लागू असलेली तिसरी भाषा पद्धती नवीन धोरण व नवीन अभ्यासक्रम लागू होईपर्यंत तशीच लागू राहील.
पूर्वीचा कार्यानुभव हा विषय यापुढे कार्यशिक्षण या नावाने ओळखला जाईल.
१. इ.३री, ४थी, ६वी साठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासूनच अंमलात येतील, इ.५वी, ७वी व ८वी साठी नवीन पाठ्यपुस्तके लागू झाल्यावर बंधनकारक राहील.
२. इतर इयत्तांसाठी सुद्धा वेळापत्रक याप्रमाणे ठेवण्यास हरकत नाही जेणेकरुन शाळेतील घंटा / Bell वाजविण्याचे नियोजन सुकर होईल. इतर वर्गांसाठी त्यांच्या विषय रचनेप्रमाणे विषयनिहाय तासिकांची संख्या प्रचलित सूचनांप्रमाणे ठेवले जावेत.
३. यासोबत नमुन्यादाखल देण्यात आलेले साप्ताहिक शालेय वेळापत्रक हे एक उदाहरण असून त्यामध्ये विषय तासिकेच्या क्रमवारीमध्ये व शाळा सुरु करण्याच्या वेळेमध्ये शाळांना बदल करता येतील. परंतु विषयनिहाय अध्ययन-अध्यापनाचा साप्ताहिक व वार्षिक घड्याळी तासांचा कालावधी कोणत्याही विषयासाठी शाळा स्तरावर कमी करता येणार नाही.
४. वेळापत्रकामध्ये काही ठिकाणी २ तासिका जोडून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये तोडी-लेखी-प्रात्यक्षिक-सराव असे वैविध्यपूर्ण अध्यापन होणे अपेक्षित आहे.
५. पूर्णवेळ शाळांमधील अध्यापन कालावधी व दोन सत्रात भरणाऱ्या शाळांमधील अध्यापन कालावधी समान राहील याची दक्षता घेतलेली आहे. केवळ परिपाठ, मधली सुट्टी, अतिरिक्त समृद्धीकरण तासिका (AEP-Additional Enrichment Period) यांच्या कालावधीमध्ये वेळेच्या उपलब्धतेनुसार तफावत असू शकेल.
६. अतिरिक्त समृद्धीकरण तासिका (AEP) ह्या विद्यार्थ्यांना कोणत्याही अभ्यास विषयात सक्षम करण्यासाठी अतिरिक्त मार्गदर्शनासाठी आहेत. यामध्ये उपचारात्मक अध्यापन, स्पर्धा परीक्षा तयारी, सराव इत्यादी उपक्रम घेता येतील. अतिरिक्त समृद्धीकरण तासिका (AEP) कोणत्या विषयासाठी आवश्यक आहे हे शाळेतील गरजेनुसार ठरवावे.
७. दोन सत्राच्या वेळापत्रकामध्ये अतिरिक्त समृद्धीकरण (AEP) तासिकांसाठी वेळ देता आलेला नाही, अशा शाळांनी शालेय वेळेव्यतिरिक्त / विद्यार्थी विभागणी करून, अतिरिक्त समृद्धीकरण तासिका (AEP) पूर्ततेसाठी प्रयत्न करावेत.
८. AEP ही पूरक मार्गदर्शनासाठी असल्याने त्याचा समावेश नियमित वार्षिक अध्यापन कालावधीमध्ये करण्यात आलेला नाही तथापि ह्या तासिका साप्ताहिक वेळापत्रकामध्ये दर्शविलेल्या आहेत.
९. स्काऊट गाईड, आनंददायी शनिवार असे पूरक उपक्रम शालेय वेळेव्यतिरिक्त घेता येतील.
१०. दिनांकः ०२/०९/२०२५ इ.१ली ते ८वी च्या शाळांमध्ये मूल्यवर्धन उपक्रमासाठी तासिका नियोजन दिलेले आहे. मूल्यवर्धन उपक्रम लागू असलेल्या शाळांनी त्यानुसार कार्यवाही केली जाईल.






