“आठवणीतील कात्रण संग्रह” : नाशिक मनपा उपशिक्षक राहुल कोळी यांचा अनोखा उपक्रम

आठवणीतील कात्रण संग्रह उपक्रम आणि त्याबाबत संपूर्ण माहिती उपशिक्षक राहुल कोळी यांच्या शब्दात.

नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाची शाळा मनपा शाळा क्र.५१ सिन्नर फाटा येथे कार्यरत असणारे उपक्रमशील शिक्षक राहुल कोळी यांनी आपल्या शाळेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत.”आठवणीतील कात्रण संग्रह” या उपक्रमाद्वारे त्यांनी मुलांना विधायक मार्गाकडे नेण्यासाठी आपले काम समर्पित वृत्तीने ते करत आहेत. अध्ययनासाठी पूरक उपक्रम तर ते राबवत असतातच पण सामाजिक जबाबदारी आणि भान मुलांमध्ये राहण्यासाठी सुद्धा ते प्रयत्न करत असतात. त्यांच्या उपक्रमाविषयी माहिती आज आपण त्यांच्याच शब्दात पाहूया

   

हेही वाचा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त धृवनगर मनपा शाळेत “पुस्तक वाचन” उपक्रम.

आजचे बहुतांश विद्यार्थी हे मोबाईलच्या आहारी जात असल्याचे दिसत आहे. हे विद्यार्थी जेव्हा शाळेत येतात तेव्हा आपण घरी कधी जाऊ आणि मोबाईलवर गेम खेळू अशी ते वाट पाहत असतात. अशा मुलांचा वाचण्यावर, लिखाणावर अजिबात भर नसतो. त्यांच्या डोक्यामध्ये 24 तास मोबाईलचेच विचार असतात. जेव्हा शिक्षक हे विद्यार्थ्यांना मोठ्या तळमळीने शिकवतात पण विद्यार्थी हे ज्ञान ग्रहण करत नाही, त्यामुळे आजचा विद्यार्थी अभ्यासात खूप मागे पडत चाललेला आहे.

जर विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीचा छंद जोपासला तर ते मोबाईलच्या दुनियेतून निघून अभ्यासाकडे वळतील. पालक वर्ग सुद्धा आपल्या मुलांना हातामध्ये मोबाईल देतात व मुलांच्या मोबाईल पाहण्याकडे नकळत दुर्लक्ष करत असतात. पालकांना माहीत नसतं की या मुलाच्या जीवनावर कशाप्रकारे परिणाम होईल.ज्यावेळेस विद्यार्थ्यांची मानसिकता बिघडते त्यावेळेस पालक लोक डोक्याला हात लावून बसतात. अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. एक छान असा छंद त्यांनी जर जोपासला तर ते ज्ञानग्रहण करू शकतील. विद्यार्थ्यांना तोंडी माहिती देण्यापेक्षा त्यांना प्रत्यक्ष कृतीतून जर आपण सांगितलं तर ते त्यांच्या लवकर लक्षात राहते.यासाठी मी स्वत: वेगवेगळे छंद जोपासले आणि विद्यार्थ्यानाही त्याचे महत्व सांगितले.

जी मोठी घटना घडलेली आहे आणि ती कायम आठवणीत राहील म्हणजेच त्या घटनेपासून भविष्यकाळात मोठा बोध घेता येईल अशी वर्तमानपत्राचे कात्रण मी संग्रही करून ठेवले. एकेक कात्रण मी ड्रॉइंग पेपर वर चिटकवले.त्याचा एक मोठा अल्बम मी तयार केला. आतापर्यंत मी कोणकोणते कात्रण संग्रह तयार केले याची माहिती पुढील प्रमाणे पाहू या –

1) आठवणीतील कुंभमेळा 2014-15

आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यात बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो. याची माहिती प्रत्येक वर्तमान पेपरा मधून येत होती.ही माहिती व चित्र मी कापून ठेवले व त्याचा एक मोठा अल्बम तयार केला. ज्या वेळेस मी विद्यार्थ्यांना नाशिक जिल्ह्याची माहिती सांगत होतो त्यावेळेस मी विद्यार्थ्यांना सांगितले की आपल्या नाशिक जिल्ह्यात बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो. विद्यार्थ्यांना नाशिक जिल्ह्याची इतर माहिती माहीत होती. पण विद्यार्थ्यांना कुंभमेळा म्हणजे काय हे माहीत नव्हते. त्यानी मला प्रश्न विचारला की सर कुंभमेळा म्हणजे नेमका काय ? अशावेळी मी त्यांना माहिती तर सांगितली पण मी तयार केलेला कुंभमेळ्याचा अल्बम विद्यार्थ्यांपुढे ठेवला.

तो अल्बम त्यांनी मोठ्या उत्साहाने पाहिला. तेव्हा त्यांना समजले की कुंभमेळा म्हणजे नेमका काय ? यातून त्यांना कुंभमेळा या विषयी माहिती प्राप्त झाली. आता हेच विद्यार्थी आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये होणाऱ्या नवीन कुंभमेळ्याची वाट पाहत आहेत . माझे दुसरे कात्रण संग्रह म्हणजे

2) महापुराचे थैमान 2019

पावसाळ्यात पाऊस जर पाच दिवस सतत कोसळत राहिला तर मोठी हानी होते. निसर्गाचे मोठे नुकसान होते. मागील काही वर्षामध्ये पुराचे पाणी लोकांच्या घरांमध्ये शिरले व लोकांचा संसार वाहून गेला. रस्त्यांवर पाणी साचले. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही घरे पाण्याखाली गेली .आपला संसार आपल्या स्वतःच्या डोळ्यासमोर पुराच्या पाण्यात वाहून गेला हे पाहून लोक रडू लागले. ही सर्व सत्य स्थिती वर्तमान पत्रात येत होती. त्यावेळेस मी ने हे कात्रण कापले आणि याचा एक मोठा अल्बम तयार केला. हा अल्बम विद्यार्थ्यांना दाखवला तेव्हा त्यांना सांगितलं की, जास्त पाऊस आला की कशा प्रकारे हानी होते. पूरस्थिती निर्माण झाली की आपण खचून न जाता त्याच्याशी सामना कसा करावा हे सांगितले.

3) आठवणीतील क्रिकेट वर्ल्ड कप कात्रण संग्रह

विद्यार्थ्यांना अनेक खेळाडूंची तसेच खेळांची माहिती माहित आहे. पण असे काही विद्यार्थी असतात की त्यांना विविध खेळांची माहिती नसते. कोणता खेळाडू कोणत्या देशाचा आहे हे सुद्धा त्यांना माहीत नसते. कोणती क्रिडा स्पर्धा किती वर्षांनी भरतो हे सुद्धा त्यांना माहीत नसते. अशावेळी आपल्या भारतामध्ये नुकताच क्रिकेट वर्ल्ड कप पार पडला. या वर्ल्डकप मध्ये एकूण दहा संघांनी भाग घेतला होता. हा वर्ल्ड कप दिवाळीच्या दरम्यान सुरू झाला होता. प्रत्येक क्रिकेट सामन्याची माहिती रोज वर्तमान पेपरामध्ये यायची. त्याचा मी कात्रण संग्रह तयार केला व दिवाळीमध्ये मी त्याचा एक मोठा अल्बम तयार केला. हा अल्बम मी विद्यार्थ्यांसमोर ठेवला. विद्यार्थ्यांनी तो अल्बम मोठ्या उत्साहाने पाहिला. क्रिकेट खेळाची माहिती जाणून घेतली.


असे अनेक उपक्रम हे माझ्या शाळेमध्ये मी राबवत असतो. विद्यार्थ्यांना जगाची माहिती व्हावी म्हणून मी शाळेमध्ये वर्तमान पेपर सुरू केलेले आहे. विद्यार्थी मधल्या सुट्टी मध्ये वर्तमान पेपर मोठ्या उत्साहाने वाचतात.जगाची माहिती मिळवतात. मधल्या सुट्टी मध्ये मी विद्यार्थ्यांना जेवणाआधी हात स्वच्छ धुण्यासाठी हँडवॉश देतो. विद्यार्थी हॅन्ड वॉशने हात स्वच्छ धुतात. मग जेवायला बसतात. म्हणजेच त्यांना आरोग्याच्या चांगल्या सवयी लागलेल्या आहेत हे यावरून दिसून येते.
तसेच मी माझ्या वर्गामध्ये गणित, मराठी व इंग्रजीच्या शब्द कुंड्या तयार केलेल्या आहेत . या शब्द कुंड्यांच्या माध्यमातून विद्यार्थी ज्ञान आत्मसात करतात. असे अनेक उपक्रम मी माझ्या शाळेमध्ये पार पाडत असतो आणि भविष्यात ही अनेक उपक्रम घ्यायचे विचाराधीन आहे.

Leave a Comment