सेवापूर्ती समारंभ : मुख्याध्यापक सोनजी गवळी एक समर्पित व्यक्तीमत्व या विषयी सविस्तर लेख
Table of Contents
2 मे रोजी संध्याकाळी सिडको येथील उत्तमनगर येथे मनपा शाळा क्रमांक २२ धृवनगर चे मुख्याध्यापक सोनजी गवळी यांचा सेवापूर्ती समारंभ Hotel hariom Palace येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला नगरसेवक दिनकर आण्णा पाटील,अमोल दादा पाटील, उपशिक्षणाधिकारी गवळी सह इतर ही मोठ्या हस्ती उपस्थित होत्या
या कार्यक्रमाला मनपा शाळा क्रमांक २२ धृवनगर चे उपशिक्षक नामदेव जानकर यांनी मुख्याध्यापक सोनजी गवळी यांच्या समवेत चा अनुभव भाषणाच्या स्वरूपात व्यक्त केला तो खालील प्रमाणे.
आदरणीय उपस्थित मान्यवर, गवळी सर,गवळी मॅडम, शिक्षकवृंद,सर्व नातेवाईक व हितचिंतक
आजचा सेवापूर्ती समारंभ हा क्षण आनंदाचा आहे की दुःखाचा, हेच समजत नाही. कारण आज आपण अशा व्यक्तिमत्वाच्या सेवेला निरोप देत आहोत, ज्यांनी आपल्या कार्याने, स्वभावाने आणि प्रेमाने आपल्या सगळ्यांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे—ते म्हणजे आपले आवडते,लाडके मुख्याध्यापक श्री गवळी सर.
शाळेच्या अंगणात एक दीप उजळला,
ज्ञानाचा मार्ग दाखवत सतत पेटत राहिला…
गवळी सर आमच्या शाळेत आले तो दिवस अजूनही डोळ्यांसमोर ताजा आहे. चौरे सर आणि मी मिळून त्यांना येथे येण्यासाठी विनंती केली होती, आणि त्यांनी आमच्या त्या विनंतीचा मान ठेवला. कदाचित तेव्हा आम्हालाही कल्पना नव्हती की हा निर्णय आपल्या शाळेच्या इतिहासाला नवे वळण देणारा ठरेल.
आमच्या विनंतीला मान देऊन जेव्हा ते आले,
ध्रुव नगरच्या शाळेला नवे आकाश त्यांनी दिले…
हे ही वाचा: SQAAF app मध्ये शाळा गुणवत्ता आणि आश्वासन आराखडा स्वयं मूल्यांकन
सर आले… आणि शाळा बदलायला सुरुवात झाली. फक्त भिंती नव्हे, तर विचार बदलले. महानगरपालिका शाळा क्रमांक २२, ध्रुव नगर ही “स्मार्ट शाळा” म्हणून ओळखली जाऊ लागली.यात योग ही होता आणि कर्मयोग ही होता.पण लक्षात राहिले ते गवळी सरांच्या कार्यकाळात सुविधा संपन्न शाळेच्या आवारात आम्ही रममान झालो. डिजिटल साधनांनी वर्ग उजळले, आणि भौतिक सुविधा व गुणवत्तेने शाळेचा दर्जा उंचावला. पण यामागे केवळ योजना नव्हती—तर होता एक जिद्दी माणूस, जो शाळेसाठी झटत होता.सकारात्मक विचार असणा-या माणसाच्या सहवासाने सुद्धा सर्व सकारात्मक घडत राहते.
रोखठोक स्वभाव, पण मन मात्र सोन्याचे,
सत्य बोलण्याची ताकद, विचार नेहमी योग्यतेचे
गवळी सरांचा स्वभाव रोखठोक आहे—हे आपण सगळे जाणतो. एखादी गोष्ट पटली नाही तर ते स्पष्टपणे सांगतात. पण त्यांच्या त्या स्पष्टवक्तेपणामागे एक प्रामाणिक मन आहे, जे नेहमी शाळेच्या हिताचाच विचार करत असे. त्यांनी कधीही भावनेच्या भरात निर्णय घेतले नाहीत; त्यांनी नेहमी प्रक्टीकॅल निर्णय घेतले.त्यामुळे त्यांच्या निर्णयांचा आम्ही नेहमी सन्मानच केला. पण एक वैयक्तिक माणूस म्हणून त्यांची सद्विवेकबुद्धी कायम जागृत असल्याचे नेहमी दिसले.
चूक झाली तरी न बोलता चारचौघांत कधी,
पण पुन्हा ती होऊ नये यासाठी घेतली काळजी आधी
भावनेपेक्षा प्रॅक्टिकल, निर्णय नेहमी शाळेसाठी,
हिताचा विचार करत राहिले प्रत्येक क्षणासाठी…
हे ही वाचा: SIR Mapping maharashtra मतदार यादीतून नाव कट होण्याअगोदर हे काम करा
स्वच्छता आणि टापटीप याबाबत त्यांची जागरूकता तर आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी स्वतःपासून सुरुवात केली आणि शाळेतील प्रत्येकाला त्या सवयीची जाणीव करून दिली. शिस्त, समर्पण, एकी आणि जबाबदारी—या मूल्यांची शिकवण त्यांनी आपल्याला दिली.
स्वच्छतेचा ध्यास त्यांनी स्वतःपासून घेतला,
टापटीपपणाचा मंत्र साऱ्या शाळेला दिला…
सरांचा एक मोठा गुण म्हणजे त्यांचे दातृत्व. स्टाफमधील कुणी काही मागितले, तर त्यांनी कधी नकार दिला नाही. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी वर्गणी काढण्याची वेळ कधी आली नाही—कारण सर नेहमी पुढे उभे राहिले. अधिकाऱ्यांसमोरही ते आपल्या शिक्षकांचे कौतुक करत—“माझे शिक्षक कष्टाळू आहेत,” हे ते अभिमानाने सांगत.
दातृत्व त्यांचे एवढे, की कधी कमी पडले नाही,
हसत-हसत वांछील ते दिले, कधी नकार दिला नाही…
खरं सांगायचं तर मुख्याध्यापक हे पद सोपे नाही. ते एक काटेरी मुकुट आहे. पण गवळी सरांनी ही जबाबदारी अत्यंत समर्थपणे पार पाडली. विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि समाज—सर्वांना एकत्र ठेवत त्यांनी शाळेचा दर्जा उंचावला.
मुख्याध्यापक पद म्हणजे काटेरी मुकुट जरी,
तरीही त्यांनी निभावली जबाबदारी उत्तम खरी…
आजही, सेवानिवृत्ती अगदी जवळ असतानाही, त्यांच्या कामातील उत्साह कमी झालेला दिसला नाही. शेवटच्या दिवसापर्यंत ते विद्यार्थ्यांसोबत काम करत होते. हीच त्यांची खरी ओळख आहे—कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि समर्पित.
सेवानिवृत्ती जवळ आली, तरी उत्साह कमी नव्हता,
शेवटच्या दिवसापर्यंत कार्यात खंड पडला नव्हता…
आज आपण त्यांच्या सेवापुर्तीला निरोप देत आहोत, पण खरं तर त्यांच्याकडून मिळालेल्या शिकवणीला, त्यांच्या आठवणींना आणि त्यांच्या संस्कारांना आपण कधीच निरोप देऊ शकत नाही.
त्यांच्या त्या कार्याला सलाम करावासा वाटतो,
असा माणूस पुन्हा मिळेल का, हा प्रश्न उरतो…
सर आमच्यासाठी हिमालय होते त्याचे स्पष्टीकरण ही देत आहे.
आम्ही धृवनगर वाशी आहोत.ध्रुव ता-याचे स्थान उत्तरेला आहे.उत्तरेच्या महासत्तेच्या बाजूने येणारे सर्व वारे हिमालयाला धडकायचे ते आमच्यापर्यंत कधीच पोहचले नाहीत.आम्ही सुरक्षित होतो पण आता हिमालय च बाजूला होत आहे.ते वारे आमच्या पर्यंत पोहचतील की काय असे वाटू लागले आहे.
सर व मॅडम तुमचा पुढचा प्रवास आनंदाचा, आरोग्यदायी आणि समाधानाचा असो—हीच आमची मनापासून प्रार्थना.
तुम्ही आमच्यासाठी फक्त मुख्याध्यापक नव्हता, तर एक मार्गदर्शक, एक प्रेरणा आणि एक कुटुंबप्रमुख होता.
आज निरोप देताना डोळे ओले होतात,
आठवणींचे क्षण हळूच मनात साचतात…
सर, आता तुमचा प्रवास नवा सुरू होईल,
स्वप्नांना पंख देऊन आयुष्य मुक्तपणे फुलेल…
आरोग्य, आनंद आणि समाधान लाभो तुम्हाला,
हीच प्रार्थना आमची प्रत्येक क्षणाला…
निरोप हा फक्त शब्द आहे, नातं मात्र कायम राहील,
तुमच्या आठवणींचा दीप आमच्या मनात सदैव पेटत राहील
मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद !






