नाशिक जिल्ह्यातील दुधाचा धबधबा एक लोकप्रिय पर्यटन स्थळ याविषयी सविस्तर माहिती खालील लेखामध्ये
Table of Contents
शनिवारचा दिवस होता. रिमझिम पाऊस सुरू होता. नाशिकला यावर्षी पाऊस जास्तच दिसतोय, असे म्हणून म्हणून आमच्या परिवारातील सर्व लोक कंटाळले होते. म्हणून शनिवारच्या अर्ध्या सुट्टीचा फायदा घेऊन आपण दुधाचा धबधबा पाहायला जायचा याचा निश्चय आम्ही सर्वांनी केला. ठरल्याप्रमाणे गाडी काढली आणि गंगापूरच्या दिशेने निघालो.. घरातून निघाल्यापासून पाऊस सुरू होता. पण बारदान फाट्याहून निघताना गंगापूरच्या रोडवर एक फाटा प्रति बालाजी या मंदिराकडे जातो आणि एक फाटा धबधब्याकडे जातो.
हे ही वाचा: नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी 2025-26 पासून टप्प्याटप्प्याने होणार
काय आश्चर्य तिथे गेलो आणि पाऊस बंद झाला.. रस्त्याच्या कडेला बहुतांश चार चाकी लावलेल्या होत्या. बहुतेक गंगापूर मध्ये एक कोणता तरी कार्यक्रम असावा असे दिसत होते त्यामुळे इतक्या चार चाकी गाड्या आलेल्या होत्या. थोडसं पुढे गेल्यावर पोलिसांचे बॅरिकेट दिसले. काही गाड्या पार्किंगचे पैसे देऊन पुढे जात होत्या. ज्यांना पार्किंग चे पैसे द्यायचे नव्हते असे चार चाकी वाले अलीकडेच रस्त्याच्या कडेला गाड्या लावून कुटुंबासह पुढे निघत होते.
पुढे गेल्यानंतर बरेचशा गाड्या रस्त्याच्या कडेला लावलेल्या होत्या. मला वाटलं पार्किंग चे पैसे देऊन या गाड्या येत आहेत या गाड्याना कुठेतरी पार्किंग स्थळ असावे पण तसं काही कुठेही दिसलं नाही. दुचाकी गाड्यांच्या मधून पर्यटक धबधब्याच्या दिशेने काही जात होते तर काही पर्यटक हातात भाजलेले मक्याचे कणीस घेऊन खात वरच्या दिशेने येत होते.
हे ही वाचा: शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा स्तरावरील समित्यांचे एकत्रिकरण

मक्याचे भाजलेले कणीस बघितल्यानंतर तोंडाला पाणी सुटले, कारण हवेत थंडावा होता काही गरम गरम खावं वाटत होतं. पुढे गेल्यानंतर आम्ही नदीपात्रात आलो. नदीच्या पात्रामध्ये भला मोठा पूल आता नवीनच बांधलेला दिसून आला. या पुलावर पर्यटक दोन्ही बाजूने नदीचे पात्र पाहण्यात दंग होते. काही पर्यटक कुटुंबा सोबत छायाचित्र काढत होते. हे पाहून आम्हालाही वाटले आपण सुद्धा मोबाईल च्या साह्याने छानसे छायाचित्र काढावे.
पुढे गेल्यानंतर लक्षात आले की मक्याचे भाजलेले कणीस आम्ही विसरून पुढे आलो आहे. हे लक्षात आल्यानंतर आम्ही परत माघारी फिरलो आणि मक्याचे कणीस खाण्याचा आनंद घेतला. त्यानंतर आम्ही पुढे पुलावरून निघालो. पुलावरून पुढे निघाल्यानंतर एक लक्षात आले की शेवटच्या टोकाला एक पायवाट होती ती पायवाट धबधब्याच्या जवळ जात होती. ती पायवाट शोधण्यासाठी आम्ही पुढे निघालो.. शेवटी आम्हाला पायवाट सापडली. त्या पायवाट्याने खाली आम्ही नदीपात्रात उतरलो. नदीपात्रात उतरत असताना पायवाट चिखलाने चिंब झालेली होती. स्वतःला सावरत आम्ही नदीपात्रातील खडकावर उतरलो. तिथे अनेक खडकाचे भाग होते. लोक सोयीनुसार खाली पडणा-या धबधब्याचे दृश्य पाहण्यामध्ये दंग होते.
हे ही वाचा: नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी 2025-26 पासून टप्प्याटप्प्याने होणार
त्या ठिकाणावरून डाव्या बाजूला अजून एक पायवाट होती, ती पायवाट पुढे जाऊन एका उंचवट्यावर जात होती आणि त्या उंचवट्यावरून धबधब्याचे दृश्य अगदी स्पष्ट आणि सुंदर दिसणारे होते. परंतु आम्हाला तिकडे जायची जास्त गरज वाटली नाही कारण आम्ही इथपर्यंत येऊ पर्यंतच थकलेलो होतो म्हणून आम्ही तिकडे जाण्याचा विचार सोडून दिला.
खडकावरून पुढे जात असताना पाण्याचा प्रवाह आमच्या आडवा आला. त्या पाण्याच्या प्रवाहातून आम्ही सावधपणे पुढे गेलो आणि पुढे असलेल्या त्या खडकावर सेल्फी काढण्याचा आनंद घेतला. पुढे गेल्यानंतर असे वाटले की धबधबा इथून दिसेल परंतु पाहिजे तितका धबधबा आमच्या नजरेच्या टप्प्यात येत नव्हता, म्हणून मी स्वतः त्या खडकाच्या टोकाला धबधबा पाहण्यासाठी गेलो. तिथे गेल्यानंतर पांढरे शुभ्र पाणी वरून खाली वेगाने पात्रामध्ये आपटत होते. हे वरून खाली पाणी आपटत असल्यामुळे काहीसे पांढरे धुके या पाण्यातून वरती निघून जात असलेले दिसत होते.
हे ही वाचा: Anganvadi: राज्यात शाळांशी लिंक होणार 1 लाखाहून अधिक अंगणवाडी केंद्र
मी यापूर्वी ऐकलेलं होतं सोमेश्वर जवळ गंगापूरचा जो धबधबा आहे तो दुधाचा धबधबा म्हणून ओळखला जातो. त्याचं कारण मला आज समजलं. खरंच पाणी दुधासारखे पांढरे शुभ्र दिसत होते. नदीच्या पात्रामध्ये धबधब्याच्या वरच्या बाजूचा जो प्रवाह आहे तो प्रवाह पावसाचे गढूळ पाण्याचा दिसत होता परंतु खडकावरून खाली पडत असलेलं पाणी मात्र पांढरे शुभ्र दुधासारखे दिसत होते. ही काय जादू असावी हे माझ्या लक्षात आलं नाही.
नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणाच्या खालच्या बाजूस असणारा जो परिसर आहे. त्या परिसरामध्ये असणारा दुधाचा धबधबा म्हणून ओळखला जाणारा हा धबधबा परिसर एक निसर्ग रम्य ठिकाण आहे. नाशिक शहरापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. सीबीएस पासून अशोक स्तंभापर्यंत येऊन तिथून गंगापूर रोड पकडल्यानंतर आनंदवली सोमेश्वर आणि बारदान फाट्याच्या पुढे आल्यानंतर त्या रोडनी एक फाटा फुटल्यानंतर तिथे हा धबधबा पाहायला मिळतो.
हे ही वाचा: प्रधानमंत्री पोषण शक्ती: योजनेंतर्गत प्रतिदिन प्रति लाभार्थी दरामध्ये सुधारणा
पावसाळ्यामध्ये हा धबधबा पाहण्यासाठी लोकांची अलोट गर्दी असते. या धबधब्याच्या जवळच सोमेश्वर मंदिर आहे. हे मंदिर अतिशय जुन्या काळातील असून अतिशय सुंदर आहे. या मंदिरामध्ये शंकराची मूर्ती असून भाविक मोठ्या गर्दीने येथे येत असतात. सोमेश्वर मंदिर हे पूर्ण झाडांनी व्यापलेले आहे आणि शेजारीच गोदावरी नदी वाहते. या परिसराला अध्यात्मिक आणि निसर्ग सौंदर्याने नटलेलं रूप आहे.
पावसाळ्यामध्ये जेव्हा गंगापूर धरण भरते तेव्हा अतिरिक्त पाणी नदीपात्रामध्ये सोडून दिले जाते. हे सोडून दिलेले पाणी उंच खडकावरून खोलगट भागात नदीपात्रात पडते. त्यामुळे इथे पाणी शुभ्र दिसते आणि धुके तयार होते. नदीपात्राच्या आजूबाजूला हिरवळ आणि गर्द झाडी आहे. अनेक जुन्या हिंदी मराठी चित्रपटाचे चित्रीकरण या धबधब्याला वर झालेले आहे. फोटो काढण्यासाठी ही जागा अतिशय विलोभनीय आहे.
पावसाळ्यामध्ये धरणातून अचानक पाणी सोडण्यात येते.. त्यामुळे नाशिक महानगरपालिका नागरिकांच्या,पर्यटकांच्या सुरक्षितेची काळजी घेते. अनेक ठिकाणी जाण्यास मनाई केली जाते. त्याचबरोबर सुरक्षारक्षक सुद्धा या ठिकाणी नेमलेले असतात.
हे ही वाचा: मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण आयोजित !
सोमेश्वरचा हा दुधाचा धबधबा नाशिक जिल्ह्यातील निसर्ग सौंदर्यामध्ये भर घालणारे एक निसर्ग रम्य ठिकाण आहे. या ठिकाणांची काळजी घेणे हे सर्व पर्यटकांची आणि येथील नागरिकांची कर्तव्य आहे. येथील स्वच्छतेविषयी अतिशय जागरूक राहणे काळाची गरज आहे. गंगापूर धरणापासून नदीपात्रातील भागामध्ये अनेक मंदिरे दिसून येतात हे आपल्या भारतीय संस्कृतीचे सुंदर रूप असलेले दिसून येते.
धार्मिक स्थळ,नैसर्गिक देखावा आणि सहलीसाठी योग्य ठिकाण या सर्वांचा मिलाप या धबधब्यात पाहायला मिळतो. पर्यटकांनी येताना निसर्गाची निगा राखावीच परंतु स्वच्छता ही पाळावी आणि सुरक्षितेचे नियम पाळावेत. त्यामुळे येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा हे निसर्गरम्य ठिकाण आपण सुरक्षित ठेवू आणि हा नैसर्गिक वारसा आपल्या पुढच्या पिढीला सांभाळायला देऊ.